कौटुंबिक अत्याचार : हुंडाबळी
भारतीय स्त्रीच्या बाबतीत दिवसेंदिवस वाढत चाललेला व तिचे प्राण घेणारा अत्याचार म्हणजे हुंडाबळी होय. या अत्याचाराची मूळ हुंड्याच्या पद्धतीत असल्याने ही समस्या समजून घेणे आवश्यक आहे. स्त्री ही मालमत्ता आहे. मालमत्ता दुसऱ्याला देणे म्हणजे दान करताना नुसतेच दान करता येत नाही, त्याबरोबर काहीतरी दिले पाहिजे या कल्पनेस समाजमान्यता होती. तेव्हा स्त्रीचा विवाह हे दानत आहे. त्यामुळे सालांकृत कन्या दान म्हणजे अलंकारासह कन्यादान करणे ही प्रथा होती आणि स्त्रीच्या अनेक स्वातंत्र्याचा संकोच होऊन विवाह हाच तिला एक संस्कार उरला होता. विवाह हा तिच्यासाठी व तिच्या घरच्यांसाठी अनिवार्य बाब होती. विवाह योग्य कन्या घरात ठेवणे ही जननिदेची गोष्ट मानली जाई. शिवाय या मुलीच्या हातुन पापं घडले वा कोणीतरी तिचा गैरफायदा घेतला तर सारे कुटुंबच उध्वस्त होईल ही सततची भीती. या दृष्टीने स्त्रीच्या जन्मापासूनच स्त्री ही त्या घरासाठी ओझे होते कारण विवाहाच्या वेळी वराला, वराच्या घरच्यांना वधूपित्याला रोख रक्कम, सोने -नाणे, भेटवस्तू वगैरे द्यावे लागे. ...