कौटुंबिक अत्याचार : हुंडाबळी
भारतीय स्त्रीच्या बाबतीत दिवसेंदिवस वाढत चाललेला व तिचे प्राण घेणारा अत्याचार म्हणजे हुंडाबळी होय. या अत्याचाराची मूळ हुंड्याच्या पद्धतीत असल्याने ही समस्या समजून घेणे आवश्यक आहे. स्त्री ही मालमत्ता आहे. मालमत्ता दुसऱ्याला देणे म्हणजे दान करताना नुसतेच दान करता येत नाही, त्याबरोबर काहीतरी दिले पाहिजे या कल्पनेस समाजमान्यता होती. तेव्हा स्त्रीचा विवाह हे दानत आहे. त्यामुळे सालांकृत कन्या दान म्हणजे अलंकारासह कन्यादान करणे ही प्रथा होती आणि स्त्रीच्या अनेक स्वातंत्र्याचा संकोच होऊन विवाह हाच तिला एक संस्कार उरला होता. विवाह हा तिच्यासाठी व तिच्या घरच्यांसाठी अनिवार्य बाब होती. विवाह योग्य कन्या घरात ठेवणे ही जननिदेची गोष्ट मानली जाई. शिवाय या मुलीच्या हातुन पापं घडले वा कोणीतरी तिचा गैरफायदा घेतला तर सारे कुटुंबच उध्वस्त होईल ही सततची भीती. या दृष्टीने स्त्रीच्या जन्मापासूनच स्त्री ही त्या घरासाठी ओझे होते कारण विवाहाच्या वेळी वराला, वराच्या घरच्यांना वधूपित्याला रोख रक्कम, सोने -नाणे, भेटवस्तू वगैरे द्यावे लागे. या प्रथेला पुढे धर्माचा देखील असलेला नसलेला आधार जोडला गेला आणि विवाहाबरोबर हुंडा देणे स्त्रीला अनिवार्य माणण्यात येऊ लागले. ज्यांना हे शक्य नसे, मुलीचे ओझे पेलवत नसे त्यांना आपल्या मुलीची जन्मताच बालहत्या करावी लागे.म्हणजे हुंड्याच्या निमित्ताने स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारास ती जन्मताच बळी पडत असे. भारतीय समाजातील हुंडयाची, वधूमूल्यांची प्रथा ही अमानुषतेचे टोक गाठणारी समस्याच आहे. साधारणतः दरवर्षी 6000 हुंडाबळीच्या घटना भारतात घडून येतात. हुंडाबळीचे प्रमाण सर्वात अधिक उत्तर भारत, आंद्रप्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, ओरिसा व राजस्थान या राज्यात आढळते. विशेषतः बऱ्याच पालकांना हुंड्यची रक्कम देण्यासाठी कर्ज काढावे लागते. वरपक्षाचे लोक वधूपक्षाची आर्थिक व मानसिक कोंडी करतात. कर्ज फेडण्यासाठी मुलीच्या वडिलांना, कुटुंबियांना आर्थिक ताणतणावाखाली ओढग्रस्तीचे जीवन जगावे लागते.कुटुंबातील मानसिक स्वास्थ्य नष्ट होते. कर्ज फिटले नाही तर घर, जमिनी गमवाव्या लागतात. आपणासाठी घरच्यांना हा त्रास होतोय याची जाणीव असलेली मुलगी सासरी देखील आपल्या पालकांच्या काळजीत राहते. ज्या कुटुंबात मुलींची संख्या जास्त असते त्या मुलींच्या व्यक्तीमत्व ची वाढ निकोप होत नाही. एकतर आपण घरदाराला ओझे आहोत असे त्यांच्या पालकांप्रमाणे त्यांनाही वाटते. अशा मुली घरातून कुणाचा तरी हात धरून पळून जाणे, आत्म हत्या करणे या टोकापर्यंत जातात.गरीब आई -बाप मुलीच्या पसंती -नापसंतीचा विचार न करता बिजवर वा वृध पुरुषाशी विवाह करत, आई -वडील प्रसंगी शरीराची, वयाची साथ नसता नौकरी करतात. नौकरदार नोकरीच्या ठिकाणी मुलीच्या लग्नासाठी भ्रष्टाचार करतात. नोकरीच्या ठिकाणी मुलीचा दुरुपयोग करून तिचा लैगिक छळ केला जात असला तरी मुलीला त्या ठिकाणी हुंडयाची रक्कम जमा करण्यासाठी नौकरी करु दिली जाते. विवाहाने दोन मने, दोन जीव, दोन कुटुंबाचे मिलन होते ही उदात्त कल्पना हुंडयाच्या पूर्तते वर ठरते. जर एनवेळी लग्नात हुंडयाची रक्कम पूर्ण दिली गेली नाही तर लग्न मोडणे, वरात परत नेणे अशाही संकटाना मुलींना व त्यांच्या कुटुंबियांना तोंड द्यावे लागे. हुंडा पद्धती ही हिंदू समाजातील अति प्राचीन अनिष्ट प्रथा आहे. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांत या समस्येची पाळेमुळे दिसून येतात.ही पद्धत केव्हा रूढ झाली हे नक्की सांगता येत नाही पण ती फार प्राचीन आहे या बद्दल दुमत नाही. योग्य वर निवडून विवाहाच्या वेळी वधूच्या पित्याने आपल्या कन्येचे गायी सह दान करावे अशी पद्धत जुन्या काळात होती. कुटुंबाची अर्थर्जानाची सोय व्हावी हा त्यामागचा अगदी विधायक असा दृष्टिकोन होता. नंतर या प्रथेला विकृत स्वरूप येऊन त्याचे हुंडयासारख्या जीवघेण्या प्रथेत रूपांतर झाले. हुंडयाचे आताचे स्वरूप हुंडा पद्धत ही भारतीय सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य घटकच होऊन बसली आहे हे स्पष्ट करते. वेबस्टारच्या शब्द कोषात हुंडयाचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे. " विवाहाच्या वेळी वधू नवऱ्या कडे जो पैसा, वस्तू अथवा मालमता घेऊन येते त्याला हुंडा असे म्हणतात. " मॅक्सरेडीन यांनी सामाजिक शास्त्रच्या ज्ञानकोषात हुंडयाची व्यख्या पुढील प्रमाणे केली आहे. " वरास त्याच्या लग्नाच्या वेळी त्याच्या पत्नी कडून किंवा तिच्या नातेवाईकांकडून मिळणारे धन किंवा संपत्ती म्हणजे हुंडा. " तेव्हा हुंडा पद्धती म्हणजे वरास वधू पक्षा कडून रोख पैसे, मौल्यवान वस्तू किंवा स्थावर मालमतेच्या स्वरूपात मिळणारे धन किंवा संपत्ती होय.हे धन स्वखुशीने दिले जाते. तसेच ठराव करून मागितले जाते. परुंतु वधूचा वराने स्वीकार करावा म्हणून अगतिक पणे तेवढे द्रव्य वधूपक्षाकडून वराला द्यावेच लागते. त्या दृष्टीने हुंडा म्हणजे वरदक्षिणा होय.
Comments
Post a Comment